ज्ञानदेव महाराजांचें महाराष्ट्र्संतमंडळात अनेक बाजूंनी अत्यंत महत्व आहे. तत्त्वज्ञानी, प्रेमळ ईश्वरभक्त, सामाजिक नेते, अलौकिक योगी, ब्रह्मचारी, धर्मसंरक्षक आणि प्रासादिक ग्रंथकार, अशा अनेक नात्यांनी त्यांची निर्मळ किर्ती आज अखंडपणे दिव्य घोषाने महाराष्ट्रात आणि जगात दुमदुमत राहिली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कर्ते आणि वैष्णवसंप्रदायाचे प्रवर्तक या नात्याने मननशील ज्ञानीजनांच्या, तसेच भोळ्या भाविक वारकऱ्यांच्याही जिव्हाळ्याशी ते एकजीव झाले आहेत.
ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे गोदातीरावरील पैठणजवळील आपेगावच्या गोविंदपंत कुलकर्ण्यांचे चिरंजीव. अल्पवयातच वेदाध्ययन व शास्त्राध्ययन करून विठ्ठलपंत मोठे ज्ञानसंपन्न व वैराग्यशील ईश्वरभक्त झाले. संसारात त्यांचे मन रमेना. तीर्थक्षेत्रींच्या यात्रा कराव्या, भक्तमंडळींच्या सहवासात रमावे, आणि ईश्वरसेवेत आयुष्य सार्थकी लावावे, अशी सारखी त्यांच्या मनाला ओढ लागली होती. यामुळे कुमारावस्थेतच ते तीर्थाटनाकरिता घराबाहेर पडले, आणि निरनिराळ्या क्षेत्रांचे दर्शन घेत घेत पुण्याजवळच्या आळंदी या गावी आले. आळंदीस सिधोपंत कुलकर्णी नावाचे एक सुखवस्तु व भाविक सज्जन राहात होते. सिद्धेश्वराच्या मंदिरात उतरलेल्या या तरुण पांथस्थ ब्राह्मणाची ती ज्ञानसंपन्न मुद्रा , निर्मळ वॄत्ती आणि कर्मनिष्ट आचरण पाहून सिधोपंतांनी आपल्या उपवर कन्येचे त्याच्याशी लग्न लावून देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे विठ्ठलपंताजवळ आपला विचार बोलून दाखवला. वैराग्यशील विठ्ठलपंतानी या गोष्टीस आपली सहमती दर्शवली नाही; पण लवकरच त्या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याबद्दल स्वप्नदॄष्टांत झाला, आणि हाच ईश्वरी संकेत असावा असे समजून विठ्ठलपंतानी सिधोपंतांच्या मुलीशी, रुक्मिणीशी विधिवत विवाह करून संसार थाटला.
विठ्ठलपंतांनी गॄहस्थाश्रमाचा स्वीकार केला खरा, पण संसारात त्यांचे मन काही रमेना. आपण निष्कारण या गुंत्यात गुरफटलो असे वारंवार त्यांच्या मनात येऊ लागले. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस ते आळंदीस राहिले. त्यानंतर ते आपेगावला आई-वडिलांकडे गेले. पण मुलाचा संसार डोळे भरून पाहाण्याचा योग मात्र विठ्ठलपंतांच्या मातापित्यांच्या नशिबात नव्हता. ते लवकरच स्वर्गवासी झाले, आणि विठ्ठलपंत स्वतंत्र गॄहपति झाले. परंतू दिवसेंदिवस त्यांचे वैराग्य वाढीस लागले. त्यांची पत्नी संसाराचा गाडा कसा चालणार या चिंतेने झुरणीस लागली. अखेर सिधोपंतांनी आपेगावांस येऊन या जोडप्यास आळंदीस नेले. पण यामुळे विठ्ठलपंतांच्या वृत्तीत काडीमात्रही बडल झाला नाही, उलट पोटी संतान नसल्यामुळे त्यांच्या विरक्त वृत्तीला जोरच चढला. शेवटी एक दिवस ते घरातून बाहेर पडले, परत आलेच नाहीत.
घरातून बाहेर पडल्यावर विठ्ठलपंतांनी तडक काशीक्षेत्र गाठले. काशीस पोहोचल्यावर त्यांनी आपल्या संसाराची खरी हकीकत न सांगता, रामानंद स्वामींचा उपदेश घेऊन संन्यास दीक्षा घेतली.
इकडे रुक्मिणीबाई आळंदीस दु:खसागरात बुडाल्या. पतीच्या आकस्मिक नाहीसे होण्याने जीवन व्यर्थ वाटू लागले. अखेर एकभुक्त राहून पिंपळाला घालण्याचे व रात्रंदिवस ईश्वरभजन करण्याचे व्रत रुक्मिणीबाईंनी घेतले.
अशा रितीने रुक्मिणीबाईंचा काळ कष्टात चालला असता, योगायोगाने रामानंदस्वामी रामेश्वरच्या यात्रेकरिता निघाले असता, वाटेत आळंदीस त्यांचा मुक्काम पडला. ते मंदिरात उतरले. संध्याकाळी देवदर्शनास आलेल्या रुक्मिणीबाईंनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा रामानंदस्वामींनी त्यांना सौभाग्यवतीस `पुत्रवती भव' असा आशिर्वाद दिला. त्यामुळे आधीच दु:खी असणाऱ्या रुक्मिणीबाईंच्या डोळ्यातून अश्रू आले. बाईंची अशी अवस्था पाहून स्वामींना चौकशी अंती घडला प्रकार समजला. परागंदा झालेल्या व्यक्तीच्या वर्णनावरून ती व्यक्ती म्हणजे आपला नवीन शिष्य `चैतन्याश्रम' असावा अशी शंका आली. काशींस आल्यावर रामानंद स्वामीनी चैतन्याश्रमाच्या गतायुष्याची चौकशी केली. खरा प्रकार उघडकीस आल्याने चैतन्याश्रमाने आपला अपराध कबूल केला. संतानहीन स्त्रीला तिच्या अनुमतीविना टाकून देणारा गृहस्थ जर संन्यास घेईल आणि त्याला संन्यास दीक्षा कोणी देईल, तर ते दोघेही दोषी ठरतात. त्यामुळे रामानंदस्वामींनी चैतन्याश्रमाने आळंदीस परत जाऊन गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा अशी आज्ञा केली. खजील झालेल्या चैतन्याश्रमाने ती निमूट पाळली. अशाप्रकारे विठ्ठलपंत संन्याशाचे पुन्हा संसारी गॄहस्थ झाले.
विठ्ठलरुक्मिणींची वियोगाची साडेसाती संपून ती आता एकत्र नांदू लागली खरी, पण त्यांना लोकक्षोभाच्या झळा जाणवू लागल्या. संन्यासी पुन्हा संसारी झाला ही घटना समाजास मानवली नाही. आळंदीस ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना वाळीत टाकले.
बहिष्कॄत स्थितीत विठ्ठलपंत आपला सर्व काळ ग्रंथवाचन, आत्मचिंतन व ईश्वरभजनात घालवू लागले. रुक्मिणीबाईही, पतिसेवेत आपल्याला सर्वकाही लाभले असे समजून आनंदात राहात. काही काळानंतर त्यांना संतानप्राप्ती झाली. विठ्ठलरुक्मिणींस तीन मुले आणि एक मुलगी अशा चार अपत्यांचा लाभ झाला. ज्येष्ठ चिरंजीव निवृत्ती जन्मशक ११९५, दुसरे ज्ञानदेव, जन्मशक ११९७, तिसरे सोपान, जन्मशक ११९९ आणि चौथी मुक्ताबाई, जन्मशक १२०१.
मुले झाल्यावर मात्र या मुलांचे पुढे कसे होणार याविषयी दोघांना चिंता वाटू लागली. सर्व मुले बुद्धिमान होती, आणि विठ्ठलपंत स्वत: मोठे व्युत्पन्न असल्याने मुलांच्या विद्याअभ्यासात कोणताही व्यत्यय आला नाही. पण जेव्हा निवृत्तिनाथ सात वर्षाचे झाले व त्यांचे उपनयन न झाल्यास त्याला ब्राह्मणत्वाचा मान मिळणार नाही, असा प्रसंग येऊन ठेपला, तेव्हा मात्र विठ्ठलपंत खचून गेले. आळंदीच्या ब्राह्मणांस `आम्हास पंक्तिपावन करून घ्या' अशी विनवणी करू लागले. परंतू त्यांचे कोणीही ऐकेना.
मुले मोठी होत चालली, ती ज्ञानसंपन्न होऊन अधिकारीही बनली, पण मौंजीबंधनादि संस्कार न घड्ल्यामुळे त्यांना समाजमान्यता मिळेना. हे पाहून विठ्ठलपंतांचे प्राण कासावीस होत होते. आळंदीतील ब्राह्मण दाद देत नाहीत म्हणून पत्नीसह मुलांना घेऊन विठ्ठलपंत आपेगावास आले. तेथील ब्राह्मणांनी तर त्यांना असे सुनावले की, `तुमच्या दोषास देहदंडावाचून दुसरे प्रायश्चित्त नाही.
आपल्या मुलांची बुद्धिमत्ता आणि त्यांच्यातील दैवी गुण विठ्ठलपंतानी ओळखले होते. समाजाच्या आडमुठेपणामुळे व समजुतीमुळे मुलांची बुद्धिमत्ता व दैवी गुण व्यर्थ जातील या विचाराने त्यांचे ह्रदय विदीर्ण झाले. मग पूर्ण विचारांती एके दिवशी मुलांच्या नकळत पत्नीसह प्रयागक्षेत्री गेले व तेथेच दोघांनी जलसमाधी घेतली.
अशाप्रकारे निवृत्तिदेवादि भावंडे आता पोरकी झाली. परंतू त्यांनी धीर सोडला नाही. कोरान्न मागून आपेगांव व पैठण येथे दिवस काढले व ब्राह्मणांनी आपणांस पंक्तिपावन करून घ्यावे म्हणून प्रयत्न चालविले. या मुलांची वृत्ती, चर्या, विलक्षण बुद्धिमत्ता व शीलवंतपणा पाहून पैठणकरांचे मन द्रवले. त्यांनी असा निर्णय दिला की_
अनन्य भक्ती हरिपादपद्मीं
निष्ठा धरा केवळ सौख्यसद्मीं ।
तीव्रानुतापें भजनासि सारा
टाकोनि मायामय हा पसारा ॥
चित्तीं चिदानंद धरोनि राहा
चैतन्य तें एक अखंड पाहा ।
या पद्धतीनेच तराल लोकीं
यावेगळा मार्ग तुम्हां नसें कीं ॥
जितेंद्रियत्वेंचि वसा अखंड
न वाढवा संसॄतिकामबंड ।
वैराग्ययोगेचि धरोनि पिंड
वर्ता, तुम्हां निष्कॄति हे उदंड ॥
- निरंजन माधव.
अशा प्रकारे पैठणकर ब्राह्मणसमाजाच्द्या संमतीने ही भावंडे ब्रह्मचर्याचे पालन करू लागली. शालिवाहन शके १२०९ मध्ये शुध्दिप्रकरण निकाली निघाल्यावर ही चारी भावंडे नेवासे गावी येऊन राहिली. हे गाव नगर जिल्ह्यात प्रवरेच्या काठी दोन्ही बाजूस वसले आहे. गावाच्या दोन्ही बाजूस खंडोबाचे नेवासे आणि म्हाळसामोहिनीराजाचे नेवासे अशी नावे आहेत. पैकी दक्षिणतीरावरील म्हाळसेच्या देवालयात ज्ञानदेवांनी आपली श्रीमद्भगवद्गीतेवरील भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी शालिवाहन शके १२१२ मध्ये रचून पुरी केली. ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात म्हणतात:-
ऐसे युगीं वरि कळीं । आणि महाराष्ट्र्मंडळीं ।
श्रीगोदावरीच्या कूळीं । दक्षिणिलीं ॥ १८०२ ॥
त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचकोश क्षेत्र ।
जेथ जगाचे जीवनसूत्र । श्रीमहलया असे ॥ १८०३ ॥
तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु ।
न्यायाते पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु ॥ १८०४ ॥
तेथ महेशान्वयसंभूतें । श्रीनिवृत्तिनाथसुतें ।
केलें ज्ञानदेवे गीते । देशीकार लेणें ॥१८०५ ॥
ज्ञानेश्वरीची रचना शा. श. १२१२ त समाप्त झाली, म्हणजे हे ग्रंथरत्न जन्मास आले,त्यावेळीं त्याचा जनक केवळ पंधरासोळा वर्षांचा होता. ज्ञानदेवांच्या बुध्दिसामर्थ्याची कल्पना येण्यास ही एवढीच साक्ष पुरी आहे.
ज्ञानेश्वरीची रचना सामान्य लोकांना परमार्थाची ओळख करून देऊन खऱ्या भक्तिमार्गाला लावण्याकरितां झाली, हे स्वयंसिद्धच आहे. परंतू श्रोत्यांना हे परमार्थाचे विवेचन रुक्ष व शुष्क वाटू नये, म्हणून ते रसाळ काव्यमय करण्याचाही त्यांनी चंग बांधला होता. काव्यात शृंगाररसाला प्राधान्य असते, परंतू शृंगारावरही ताण करील असे सोज्वळ काव्य असावे असा त्यांचा मानस होता. संस्कॄतला ते मान देतच असत, पण प्राकॄत मराठीही गीर्वाणवाणीच्या पाटी बसण्याच्या योग्यतेची आहे, हेही त्यांना प्रत्यक्ष कॄतीने दाखवून द्यायचे होते. ते म्हणतात--
देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणे ।
तरि ओंविया होती लेणें । साहित्यासी ॥ ४२ ॥
मूळ ग्रंथींचिया संस्कृता । वरि मऱ्हाठी नीट पढतां ।
अभिप्राय मानलिया उचित्ता । कवण भूमी हें न चोजवे ॥ ४३ ॥
जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणिया आंगचि होय लेणें ।
तेथ अळंकारिलें कवण कवणें । हे निर्वचेना ॥ ४४ ॥
तैशी देशी आणि संस्कॄत वाणी । एका भावार्थाच्या सुखासनीं ।
शोभती आयणी । चोखट आइका ॥ ४५ ॥
उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप ।
चातुर्य म्हणे पडप जोडलें आम्हां ॥ ४६ ॥
तैसें देशियेचें लावण्य । हिरोनी आणिले तारुण्य ।
मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ॥ ४७ ॥ अध्याय १०.
अशा प्रकारचे मराठीच्या पुरस्काराचे वे काव्यपरिपोषासंबंधीचे उद्गार ज्ञानेश्वरीत वाचकांना जागोजागी आढळतील. ज्ञानेश्वरीची भाषा फारच कोमल, मधुर, प्रौढ व वेचक आहे. वसंतच्या घरी सुगंध आणि फुलांची संपत्ती लोळत असावी त्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या संग्रही शब्दसंपत्ति व कल्पनासंपत्ति अलोट असलेली आढळते.
ज्ञानेश्वरीची रचना झाल्यानंतर ज्ञानदेव वारकरी संप्रदायात संत नामदेवांच्या संगतीने समाविष्ट झाले,आणि लवकरच त्याचें अध्वर्युत्व त्यांच्या गळ्यात पडले. त्यानंतर ज्ञानदेवांनी आत्मरंजनाकरिता व विठ्ठलसंप्रदायाकरिता अमृतानुभव, अभंग व पदे यांची रचना केली.
यानंतर नामदेवांना व इतर वैष्णवसंतांना बरोबर घेऊन ज्ञानदेव उत्तर हिंदुस्थानात तीर्थयात्रा करण्यास गेले. या तीर्थाटनात त्यांनी वैष्णवसंप्रदायाचा प्रसार पंजाबसारख्या दूरच्या प्रांतात केला.
तीर्थाटनाहून परत आल्यावर शा. श. १२१८ कार्तिक वद्य त्रयोदशीस ज्ञानदेव महाराजांनी आळंदीस आपल्या भावंडांच्या व नामदेवादि संतमंडळींच्या समक्ष जीवत्समाधी घेतली. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर त्यांची तिन्ही भावंडे एकदीड वर्षाच्या आत एकामागून एक परंधामास गेली.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना