शब्दखंडन

बाप उपयोगी शब्दु । स्मरणदानीं प्रसिध्दु ।
अमूर्ताचा विशदु । आरिसा नव्हे ? ॥१॥

पहातें अरिसा पाहे । तेथें कांहींचि नवल नव्हे ।
परि दर्पणें येणें होये । न पाहतें, पाह्तें ॥२॥

वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा ।
येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥३॥

अपण तंव खपुष्प । परि फळ दे जगद्रुप
शब्द मवीतैं (तें) उमप । कोण आहे ? ॥४॥

विधिनिशेधांचिया वाटा । दाविता हाचि दिवटा
बंधमोक्ष कळिकटा । शिष्टु हाची ॥५॥

हा अविद्येचा आंगी पडे । तैं नाथिलें ऐसें विरूढे ।
न लाहिजे तीन कवडे । साचा वस्तु ॥६॥

शुध्द शिवाच्या शरीरीं । कुमारु हा जीउ भरी ।
जेवीं आंगें पंचाक्षरी । तेविंचि बोलु ॥७॥

जिउ देहें बांधला । तो बोलें एके सुटला ।
आत्मा, बोलें भेटला । आपणयां ॥८॥

दिवसातें उगो गेला । तंव रात्रीचा द्रोहो आला ।
म्हणोनि सूर्यो या बोला । उपमा नव्हे ॥९॥

जे प्रवृत्ति आणि निवृत्ति । विरुध्दा इया हातु धरिती ।
मग शब्देंचि चालती । एकलेनि ॥१०॥

सहाय आत्मविद्येचें । करावया आपण वेंचे ।
गोमटें काय शब्दाचें । येकैक वानूं ॥११॥

किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिध्दु ।
परि ययाही संबंधु । नाही येथें ॥१२॥

आत्मया, बोलाचें । कांहींचि उपेगा न वचे ।
स्वसंवेद्या कोणाचें । ओझें आथी ? ॥१३॥

आठवे कां विसरे । विषो होऊनि अवतरे ।
तरी वस्तूसी वस्तु, दुसरें । असेना कीं ॥१४॥

आपण आपणयातें आठवी विसरे केउतें ? ।
काय जीभ जिभितें । चाखे, न चाखे ? ॥१५॥

जागतेया नीद नाहीं । मा जागणें घडे काई ? ।
स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥१६॥

सूर्यो रात्री पां नेणे । मा दिवो काय जाणे ? ।
तेवीं स्मरणास्मरणे (वीण) । आपण वस्तु ॥१७॥

एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? ।
म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥१८॥

आणिक येक शब्दें । काज कीर भलें साधे ।
परि धिंवसा न बंधे । विचारु येथें ॥१९॥

कां जे बोलें अविद्य नाशे । मग आत्मेनि आत्मा भासे ।
हें म्हणतखेवो पिसें आलेंचि कीं ॥२०॥

सूर्यो राति पां मारील । मा आपणया उदो करील ।
हे कुडो न सरती बोल । साचाच्या गांवीं ॥२१॥

चेईले निदे रुसे । ऐसी कें नीद असे ? ।
किं चेईले चेवो बैसें । ऐसे चेणें आहे ? ॥२२॥

म्हणोनि नाशापुरती । अविद्या नाही निरुती ।
नाही आत्मा आत्मस्थिति । रिगे ऐसा ॥२३॥

अविद्या तंव स्वरूपें । वांझेचें कीर जाउपें ।
मा तर्कांचे खुरपे ! । खांडे कोणा ? ॥२४॥

इंद्रधनुष्या सितें । कवण धनवईन लाविजेतें ।
तें दिसें तैसें होतें । साच जरी ? ॥२५॥

अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका ।
तरी मार देतो तर्का । अविद्येसी ॥२६॥

साहे बोलाची वळघी । ऐसी अविद्या असे जगीं ।
तरी जाळूं ना कां आगी । गंधर्वनगरें ? ॥२७॥

नातरी दीपाचिये सोये । आंधारू कीर न साहे ।
तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ? ॥२८॥

नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु ।
तेव्हडाहि उद्वसु । उद्यमु पडे ॥२९॥

जेथे साउली न पडे तेथें नाही जेणें पाडें ।
मा पडे तेथें तेव्हडे । नाहींच कीं ॥३०॥

दिसतचि स्वप्न लटिकें । हें जागरीं होय ठाउकें ।
तेवीं अविद्याकाळी सतुकें । अविद्या नाही ॥३१॥

वोडंबरीचिया लेणिया । घरभरी आतुडलिया ।
नागवें नागविलिया । विशेषु काई ॥३२॥

मनोरथाचें परियळ । आरोगिजतु कां लक्ष वेळ ।
परि उपवासावेगळ । आनु आथी ? ॥३३॥

मृगजळ जेथ नुमंडे । तेथ असे पां कोरडें ।
माउमंडे तेथें जोडे । वोल्हांसु काई ? ॥३४॥

हें दिसे तैसें असे । तरी चित्रीचेनि पाउसें ।
वोल्हावतु कां मानुसें । आगरा तळीं ॥३५॥

कालवूनि आंधारें । लिहों येती अक्षरें ।
तरी मसीचिया बोरबारें । कां सिणावें ? ॥३६॥

आकाश काय निळें । न देखतु हे डोळे ? ।
तेवीं अविद्येचि टवाळें । जाणोनि घेईं ॥३७॥

अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे ।
हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥३८॥

आणि इये अनिर्वाच्यपण । तें दुजेंही देवांगण ।
आपुल्या अभावीं आपण । साधीतसे ॥३९॥

का हीच जरी आहे । तरी निर्द्धारु कां न साहे ? ।
वरी घटाभावें भोये । अंकित दिसे ? ॥४०॥

अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रमा ।
सुर्या आंगीं तमा । जयापरी ॥४१॥

हे अविद्या तरी मायावी । परि मायावीपणचि लपवी ।
साचा आली अभावी । आपुला हे ॥४२॥

बहुतापरी ऐसी । अविद्या नाहीं आपैसीं ।
आतां बोलू हातवसी । कवणापरी ॥४३॥

साउलियेतें साबळें । हालयां भोय आदळे ।
कीं हालेनि अंतराळें । थोंटावे हातु ॥४४॥

कां मृगजळाचा पानीं । गगनाचा अलिंगनीं ।
नातरी चुंबनीं । प्रतिबिंबाचा ॥४५॥

उठावला वोथरे तवंका । तो सुनाथ पडे असिका ।
अविद्या नाशीं तर्का । तैसें होय ॥४६॥

ऐसी अविद्या नासावी । वाहेल जो जीवीं ।
तेणें साली काढावी । आकाशाची ॥४७॥

तेणें शेळीगळां दुहावीं । गुडघां वास पाहावी ।
वाळवोनि काचरी करावी । सांजवेळेची ॥४८॥

जांभई वांटूनि रसु । तेणें काढावा बहुवसू ।
कालवूनि आळसू । मोदळा पाजावा ॥४९॥

तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु ।
वारयाचे तांथु । वळु सुखें ॥५०॥

तो बागुलातें मारू । प्रतिबिंब खोळे भरू ।
तळहातींचे विंचरू । केंस सुखें ॥५१॥

घटाचें नाहींपण फोडू । गगनाची फुलें तोडू ।
सशाचें मोडू । शिंग सुखें ॥५२॥

तो कापुराची मसी करू । रत्नदीपीं काजळ धरू ।
वांजेचें लेंकरूं । [अरणु सुखें ॥५३॥

तो अंवसेनेचि सुधाकरें । पोसू पाताळीची चकोरें ।
मृगजळींचीं जळचरें । गाळूं सुखें ॥५४॥

अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें ।
आतां काई नाशावें । शब्दें येणें ॥५५॥

नाहीं तयाचे नाशें । शब्द न ये प्रमाणदशे ।
अंधारीं अंधारा जैसें । नव्हे रूप ॥५६॥

अविद्येची नाहीं जाती । तेथें नाहीं म्हणतया युक्ती ।
जेवी दुपारीं कां वाती । आंगणींचिया ॥५७॥

न पेरितां शेती । जे कीं सवगणिया जाती ।
तयां लाजेपरौति । जोडी आहे ? ॥५८॥

खवणियाच्या आंगा । जेणें केला वळघा ।
तो न करितांचि उगा । घरीं होता ॥५९॥

पाणियावरी वरखु । होता कें असे विशेखु ।
अविद्यानाशी उन्मेखु । फांकावा तैसा ॥६०॥

माप मापपणें श्लाघे । जंव आकाश मवूं न रिघे ।
तम पाहतां वाउगें । दीपाचें जन्म ॥६१॥

गगनाची रससोये । जीभ जैं आरोगु जाये ।
मग रसना हें होये । आडनांव कीं ॥६२॥

नव्हतेनि वल्लभे । अहेवपण कां शोभे ।
खातां केळीचे गाभे । न खातां गेले ॥६३॥

स्थूळ सूक्ष्म कवण येकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु ।
परि रात्रीविषयीं अप्रयोजकु । जालाचि कीं ॥६४॥

दिठी पाहतां काय न फावे । परि निदेतें तंव न देखवे ।
चेता ते न संभवे । म्हणोनियां ॥६५॥

चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा ।
जरि दिहाचि चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥६६॥

नुसुधियेचि साचा । मुका होय वाचरुकाचा ।
अंतराळीं पायांचा । पेंधा होय ॥६७॥

तैसीं अविद्येसन्मुखें । सिद्धचि प्रतिषेधकें ।
उठलींच निरर्थकें । जल्पें होतीं ॥६८॥

अंवसे आला सुधाकरु । न करीच काय अंधकारु ? ।
अविद्यानाशीं विचारु । तैसा होय ॥६९॥

नाना न निफजतेनि अन्नें । जेवणें तेंचि लंघनें ।
निमालेनि नयनें । पाहणाचि अंधु ॥७०॥

कैसीही वस्तु नसे । जैं शब्दाचा अर्थ हों बैसे ।
तैं निरर्थकपणें नासे । शब्दहि थिता ॥७१॥

आतां अविद्याचि नाहीं । हें कीर म्हणो काई ।
परी ते नाशितां कांहीं । नुरेची शब्दाचें ॥७२॥

यालागिं अविद्येचिया मोहरां । उठलियाहि विचारा ।
आंगाचाची संसारा । होऊनि ठेला ॥७३॥

म्हणोनि अविद्येचेनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें ।
हें अविद्याचि नाहींपणें । नेदी घडों ॥७४॥

आणि आत्मा हन आत्मया । दाऊनी बोलु महिमेया ।
येईल हें साविया । विरुद्धचि ॥७५॥

आपणया आपणपेंसी । लागलें लग्न कवणे देशीं ।
कीं सूर्य अंग ग्रासी । ऐसें ग्रहण आहे ? ॥७६॥

गगन आपणया निघे ? । सिंधु आपणा रिघे ? ।
तळहात काय वळघे । आपणयां ? ॥७७॥

सूर्य सूर्यासि विवळे ? । फळ आपणया फळें ? ।
परिमळु परिमळें । घेपता ये ? ॥७८॥

चराचरा पाणी पाजणी । करूं येईल येके क्षणीं ।
परि पाणियासि पाणि । पाजवे कायी ? ॥७९॥

साठीं तिशा दिवसां । माजीं एखादा ऐसा ।
जे सूर्यासीच सूर्य जैसा । डोळा दावी ॥८०॥

कृतांत जरी कोपेल । तरी त्रैलोक्य हें जाळील ।
वांचूनि आगी लावील । आगीसि काई ? ॥८१॥

आपणपें आपणया । दर्पणेवीण धात्रेया ।
समोर होआवया । ठाकी आहे ? ॥८२॥

दिठी दिठीतें रिघों पाहे ? । रुचि रुचीतें चाखों सुये ? ।
कीं चेतया चेतऊं ये ? । हें नाहींच कीं ॥८३॥

चंदन चंदना लावी ? । रंगु रंगपणा रावी ।
मोतींपण मोतीं लेववी । ऐसें कैंचें ? ॥८४॥

सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी ।
रसपणा बुडी ते रसीं । तें कें जोडे ? ॥८५॥

आपुलिये मुकुटीं समर्था । चंद्र बैसविला सर्वथा ।
परि चंद्र चंद्राचिये माथा । वाऊं ये काई ? ॥८६॥

तैसा आत्मराजु तंव । ज्ञानमात्रचि भरींव ।
आतां ज्ञानें ज्ञानासि खेंव । कैसें दीजे ? ॥८७॥

आपुलेनि जाणपणें । आपणयातें जाणों नेणे ।
डोळ्या आपुलें पाहाणें । दुवाड जैसें ॥८८॥

आरसा आपुलिये । आंगीं आपण पाहे ।
तरी जाणणें जाणों लाहे । आपणयातें ॥८९॥

दिगंतापैलीकडेचें । धांवोनि सुरिया खोंचे ।
मा तियेका तियेचें । आंग फुटे ? ॥९०॥

रसवृत्तीसी उगाणें । घेऊनि जिव्हाग्र शाहाणें ।
परि कायी कीजे नेणे । आपणापें चाखों ॥९१॥

तरि जिव्हे काई आपलें । चाखणें हन ठेलें ? ।
तैसे नव्हे संचलें । तेंचि तेकीं ॥९२॥

तैसा आत्मा सच्चिदानंदु । आपणया आपण सिद्धु ।
आतां काय दे शब्दु । तयाचें तया ॥९३॥

कोणाही प्रमाणाचेनि हातें । वस्तु घे ना नेघे आपणयातें ।
जो स्वयेंचि आइतें । घेणें ना न घेणें ॥९४॥

म्हणोनि आत्मा आत्मलाभें । नांदऊनि शब्द शोभे ।
येईल ऐसा न लभे । उमसुं घेवों ॥९५॥

एवं माध्यान्हींची दिवी । तम धाडी ना दिवो दावी ।
तैसी उपभयतां पदवी । शब्दा जाली ॥९६॥

आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें ।
आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥९७॥

ऐसा उभय पक्षीं । बोला न लाहोनि नखी ।
हारपला प्रळयोदकीं । वोघु जैसा ॥९८॥

आतां बोला भागु कांहीं । असणें जयाच्या ठाईं ।
अर्थता तरि नाहीं । निपटुनियां ॥९९॥

बागुल आला म्हणितें । बोलणें जैसें रितें ।
कां आकाश वोळंबतें । तळहातीं ॥१००॥

तैसीं निरर्थकें जल्पें । होउनियां सपडपें ।
शोभती जैसें लेपे । रंगावरी ॥१०१॥

एवं शब्दैकजीवनें । बापुडीं ज्ञानें अज्ञानें ।
साचपणें वनें । चित्रींचीं जैसीं ॥१०२॥

या शब्दाचा निमाला । महाप्रळयो हो सरला ।
अभ्रासवें गेला । दुर्दिनु जैसा ॥१०३॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌मृतानुभवे शब्दखंडनं नाम षष्ठम प्रकरणं संपूर्णम् ॥

लेखन लिपी

देवनागरी / मराठी
Roman / English

F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

येण्याची नोंद