ज्ञानखंडन

तैसें आमुचेनि नावें । अज्ञानाचें ज्ञानही नव्हे ।
आम्हालागीं गुरुदेवें । आम्हीच केलों ॥१॥

परी आम्हा आम्ही आहों । तें कैसें पाहो जावों ।
तंव काय कीजे ठावो । लाजिजे ऐसा ॥२॥

हा ठावोवरी गुरुरायें । नांदविलों उवायें ।
जे आम्ही न समाये । आम्हांमाजीं ॥३॥

अहो आत्मेपणीं न संटो । स्वसंविति न घसवटो ।
आंगीं लागलिया न फुटों । कैवल्यही ॥४॥

आमुची करवे न गोठी । ते जालीचि नाहीं वाक्सृष्टी ।
आमुते देखे दिठी । ते दिठीचि नव्हे ॥५॥

आमुतें करूनि विखो । भोगूं शके पारखो
तैं आमुतें न देखों । आम्हीपण ॥६॥

प्रगटो लपो न लाहो । येथें नाहीं नवलवो ॥७॥
परी कैसेनिही विपावो । असणयाचा ।

किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं ।
ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥८॥

तेथ समोर होआवया । अज्ञानाचा पाडु कासया ।
केउते मेलिया माया । होऊं पाहिजे ! ॥९॥

अज्ञानाचा प्रवर्तु । नाहीं जया गांवाआंतु ।
तेथें ज्ञानाची तरी मातु । कोण जाणे ? ॥१०॥

राती म्हणोनि दिवे । पडती कीं लावावे ।
वांचून सूर्यासवें । शिणणें होय ॥११॥

म्हणोन अज्ञान नाहीं । तेथेंचि गेलें ज्ञानही ।
आता निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥१२॥

येऱ्हवी तऱ्ही ज्ञान अज्ञानें । दोहींचि अभिधानें ।
अर्थाचेनि आनानें । विप्लावलीं ॥१३॥

जैंसी दंपत्यें परस्परे । तोडोनि पालटलीं शिरें ।
तेथें पालटु ना पण सरे । दोहींचे जिणें ॥१४॥

कां पाठी लाविला होये । तो दिपुचि वायां जाये ।
दिठी अंधारें पाहे । तैं तेचि वृथा ॥१५॥

तैसें निपटून जें नेणिजे । तें अज्ञान शब्दें बोलिजे ।
आता सर्वही जेणें सुजे । तें अज्ञान कैसें ? ॥१६॥

ऐसें ज्ञान अज्ञानीं आलें । अज्ञान ज्ञानें गेलें ।
ये दोही वांझौलें । दोन्ही जाली ॥१७॥

आणि जाणे तोचि नेणे । नेणे तोचि जाणे ।
आतां कें असे जिणें । ज्ञानाज्ञाना ? ॥१८॥

एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी ।
उदैला चिद्गगनीं । चिदादित्यु हा ॥१९॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌मृतानुभवे ज्ञानखंडन नाम अष्टम प्रकरणं संपूर्णम् ॥

लेखन लिपी

देवनागरी / मराठी
Roman / English

F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

येण्याची नोंद