जीवन्मुक्तदशाकथन

आता आमोद सुनास जालें । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठले । लोचनेसी ॥१॥

आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणे ।
कीं माथेचि चांफेपणें । बहकताती ॥२॥

जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा झाले ॥३॥

फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची झाली नर ।
जालें आपुलें शेजार । निद्राळुचि ॥४॥

दिठिवियाचा रवा । नागरू इया ठेवा ।
घडिला कां कोरिवां । परी जैसा ॥५॥

चूतांकूर झाले कोकीळ । आंगच झाले मलयनीळ ।
रस झाले सकळ । रसनावंत ॥६॥

तैसें भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हें सरलें अद्वैता । अफुटामाजीं ॥७॥

सेवंतेपणा बाहेरी । न निगताचि परी ।
पाती सहस्रावरी । उपलविजे ते ॥८॥

तैसें नवा नवा अनुभवीं वाजतां वाधावी ।
अक्रियेच्या गांवीं । नेणिजे तें ॥९॥

म्हणोनि विषयांचेनि नांवें । सूनि इंद्रियांचे थवे ।
सैंघ घेती धांवे । समोरही ॥१०॥

परी आरिसा शिवे शिवे । तंव दिठीसी दिठी फावे ।
तैसे झाले धांवे । वृत्तीचे या ॥११॥

नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण ।
घेतां तरी सुवर्ण । घेईजे कीं ॥१२॥

वेंचूनि आंणू कल्लोळ । म्हणोन घापे करतळ ।
तेथें तरी निखळ । पाणीच फावे ॥१३॥

हातापाशीं स्पर्शु । डोळयापाशीं रूपसु ।
जिव्हेपाशीं मिठांशु । कोण्ही एकू ॥१४॥

तऱ्ही परिमळापरौतें । मिरवणें नाहीं कापुरातें ।
तेवीं बहुतांपरी स्फुरतें । तेंचि स्फुरे ॥१५॥

म्हणोनि शब्दादि पदार्थ । श्रोत्रादिकांचे हात ।
घ्यावया जेथ । उजू होती ॥१६॥

तेथ संबंधु होये न होये । तंव इंद्रियांचे तें नोहे ।
मग असतोंचि आहे । संबंधु ना ॥१७॥

जिये पेरीं दिसती उशीं । तिये लाभती कीं रसीं ।
कांति जेवीं शशीं । पुनवेंचिया ॥१८॥

पडिलें चांदावरी चांदिणें । समुद्रीं झाले वरिषणें ।
विषयां करणें । भेटती तैंशीं ॥१९॥

म्हणोन तोंडाआड पडे । तेंहि वाचा वावडे ।
परी समाधी न मोडे । मौनमुद्रेची ॥२०॥

व्यापाराचे गाडे । मोडतांहि अपाडे ।
अक्रियेचें न मोडे । पाऊल केंही ॥२१॥

पसरूनि वृत्तीची वावे । दिठी रूपातें दे खेवें ।
परी साचाचेनि नांवे । कांहींचि न लभे ॥२२॥

तमातें घ्यावया । उचलूनी सहस्र बाहिया ।
शेवटीं रवी इया । हाचि जैसा ॥२३॥

स्वप्नींचिया विलासा । भेटईन या आशा ।
उठिला तंव जैसा । तोचि मा तो ॥२४॥

तैसा उदैलया निर्विषयें । ज्ञानी विषयी हों लाहे ? ।
तंव दोन्ही न होनी होये । काय नेणों ॥२५॥

चंद्र वेचूं गेला चांदिणें । तंव वेंचिलें काय कोणें ।
विऊनि वांझें स्मरणें । होतीं जैसी ॥२६॥

प्रत्याहारादि अंगीं । योगें आंग टेंकिलें योगीं ।
तो जाला इये मार्गी । दिहाचा चांदु ॥२७॥

येथ प्रवृत्ति बहुडे जिणें । अप्रवृत्तीसी वाधावणें ।
आतां प्रत्यङ्मुखपणें । प्रचारु दिसे ॥२८॥

द्वैतदशेचें आंगण । अद्वैत वोळगे आपण ।
भेद तंव तंव दुण । अभेदासी ॥२९॥

कैवल्याचा चढावा । करीत विषयसेवा ।
झाला भृत्य भज्य कालोवा । भक्तीच्या घरीं ॥३०॥

घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये ।
ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥३१॥

तैसें भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां ।
ऐसें नाहीं न करितां । ठाकिजेना ॥३२॥

आठवु आणि विसरु । तयातेंही घेऊं नेदी पसरु ।
दशेचा वेव्हारु । असाधारणु ॥३३॥

झाला स्वेच्छाचि विधि । स्वैर झाला समाधि ।
दशे ये मोक्षऋद्धि । बैसों घापे ॥३४॥

झाला देवोचि भक्तु । ठावोचि झाला पंथु ।
होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥३५॥

भलतेउनि देवें । भलतेन भक्त होआवें ।
बैसला तेथें राणिवें । अकर्मु हा ॥३६॥

देवाचिया दाटणी । देऊळा झाली आटणी ।
देशकाळादि वाहाणीं । येईच ना ॥३७॥

देवीं देवोचि न माये | मा देवी कें अन्वयो आहे ? ।
येथ परिवारु बहूये । अघडता कीं ॥३८॥

ऐसियाहि स्वामीभृत्यसंबंधा । लागीं उठलीं श्रद्धा ।
तैं देवोचि नुसधा । कामविजे ॥३९॥

अवघिया उपचारा । जपध्यान निर्धारा ।
नाहीं आन संसारा । देवोवांचुनी ॥४०॥

आतां देवातेंचि देवें । देववरी भजावें ।
अर्पणाचेनि नांवें । भलतिया ॥४१॥

पाहें पां आघवया । रुखा रुखचि यया ।
परी दुसरा नाहीं तया । विस्तार जेवीं ॥४२॥

देव देऊळ परिवारु । कीजे कोरुनि डोंगरु ।
तैसा भक्तीचा व्यवहारु । कां न व्हावा ? ॥४३॥

अओ मुगीं मुग जैसें । घेतां न घेतां नवल नसे ।
केलें देवपण तैसें । दोहीं परी ॥४४॥

अखतांचि देवता । अखतींचि असे न पूजितां ।
मा अखतीं काय आतां । पुजो जावी ॥४५॥

दीप्तीचीं लुगडीं । दीपकळिके तूं वेढी ।
हें न म्हणतां ते उघडी । ठाके काई ? ॥४६॥

कां चंद्रातें चंद्रिका । न म्हणिजे तूं लेकां ।
तर्‍ही तो असिका । तियाचि कीं ना ॥४७॥

आगीपण आगी । असतचि असे अंगीं ।
मा कासयालागीं । देणें न देणें ? ॥४८॥

म्हणोनि भजतां भजावें । मा न भजतां कय नव्हे ? ।
ऐसें नाहीं स्वभावें । श्रीशिवुचि असे ॥४९॥

अतां भक्ति अभक्ति । झालें ताट एके पातीं ।
कर्माकर्माचिया वाती । काल्हावूनियां ॥५०॥

म्हणोनि उपनिषदें । दशे येति निंदे ।
निंदाचि विशदें । स्तोत्रें होती ॥५१॥

ना तरी निंदास्तुति । दोन्हीं मौनासाठीं जाती ।
मौनीं मौन आथी । न बोलतां बोली ॥५२॥

घालिता अव्हासव्हा पाय । शिवयात्राचि होतु जाय ।
शिवा गेलियाही नोहे । केंही जाणें ॥५३॥

चालणें आणि बैसक । दोन्ही मिळोनि एक ।
नोहे ऐसें कौतुक । इये ठायीं ॥५४॥

येर्‍हवीं आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा ।
भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥५५॥

ना समोर दिसे शिवुही । परि देखिलें कांहीं नाहीं ।
देवभक्ता दोही । एकुचि पाडू ॥५६॥

आपणचि चेंडू सुटे । मग आपणया उपटे ।
तेणें उदळतां दाटे । आपणपांचि ॥५७॥

ऐसी जरी चेंडूफळी । देखिजे कां केव्हेळीं ।
तरी बोलिजे हे सरळी । प्रबुद्धाची ॥५८॥

कर्माचा हातु नलगे । ज्ञानाचेंही कांहीं न रिगे ।
ऐसीचि होतसे आंगें । उपास्ति हे ॥५९॥

निफजे ना निमे । आंगें आंग घुमे ।
सुखा सुख उपमे । देववेल यया ॥६०॥

कोण्ही एक अकृत्रीम । भक्तीचें हें वर्म ।
योगज्ञानादिविश्राम । भूमिके हे ॥६१॥

आंगें कीर एक झालें । परी नामरूपाचे मासले ।
होते तेही आटले । हरिहर येथें ॥६२॥

अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें ।
ग्रहण झालें एकसरें । सर्वग्रासें ॥६३॥

वाच्यजात खाऊनी । वाचकत्वहि पिऊनी ।
टाकली निदैजोनी । परा येथें ॥६४॥

शिवाशिवा ! समर्था स्वामी । येवढीये आनंदभूमि ।
घेपे दीजे एकें आम्हीं । ऐसें केलें ॥६५॥

चेतचि मा चेवविलें । निदैलेंचि मा निदविलें ।
आम्हीचि आम्हा आणिलें । नवल जी तुझें ॥६६॥

आम्ही निखळ मा तुझे । वरी लोभें म्हणसी माझें ।
हें पुनरुक्त साजे । तूंचि म्हणोनी ॥६७॥

कोणाचें कांहीं न घेसी । आपुलेंही तैसेंचि न देसी ।
कोण जाणे भोगिसी । गौरव कैसें ॥६८॥

गुरुत्वें जेवढा चांगु । तेवढाचि तारूनि लघु ।
गुरु लघु जाणे जो पांगु । तुझा करी ॥६९॥

शिष्यां देतां वाटे । अद्वैताचा समो फुटे ।
तरी काह्या होती भाटें । शास्त्रें तुझीं ॥७०॥

किंबहुना ये दातारा । तूं याचा संसारा ।
वेंचोनि होसी सोयरा । तेणेंचि तोषें ॥७१॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌मृतानुभवे जीवन्मुक्तदशाकथनं नाम नवमं प्रकरणं संपूर्णम् ॥

लेखन लिपी

देवनागरी / मराठी
Roman / English

F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

येण्याची नोंद