परी गा निवृत्तिराया । हातातळीं सुखविलें तूं या ।
तरी निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥१॥
परी महेशें सूर्याहातीं । दिधली तेजाची सुती ।
तया भासा अंतर्वर्ती । जगचि केलें ॥२॥
चंद्रासि अमृत घातलें । तें तयाचि कायि येतुलें ।
कीं सिंधु मेघा दिधले । मेघाचि भागु ॥३॥
दिवा जो उजेडु । तो घराचाचि सुरवाडू ।
गगनी आथी पवाडु । तो जगाचाचि कीं ॥४॥
अगाधेंहि उचंबळती । तें चंद्रीचि ना शक्ती ? ।
वसंतु करी तैं होती । झाडांचें दानीं ॥५॥
म्हणोनि हें असंवर्य । दैविकीचें औदार्य ।
वांचोनि स्वातंतर्य । माझें नाहीं ॥६॥
आणि हा येवढा ऐसा । परिहारू देवू कायसा ।
प्रभुप्रभावविन्यासा । आड ठावूनी ॥७॥
आम्ही बोलिलों जें कांहीं । तें प्रकटचि असे ठायीं ।
मा स्वयंप्रकाशा काई । प्रकाशावें बोलें ? ॥८॥
नाना विपायें आम्हीं हन । कीजे तें पां मौन ।
तरी काय जनी जन दिसतें ना ? ॥९॥
जनातें जनीं देखतां । द्रष्टेंचि दृश्य तत्वतां ।
कोण्ही नहोनि आइता । सिध्दांत हा ॥१०॥
ययापरौतें काहीं । संविद्रहस्य नाहीं ।
आणि हे तया आधींही । असतचि असे ॥११॥
तऱ्ही ग्रंथप्रस्तावो । न घडे हें म्हणों पावो ।
तऱ्ही सिध्दानुवाद लाहों । आवडी करूं ॥१२॥
पढियंते सदा तेंचि । परी भोगीं नवी नवी रुची ।
म्हणोनि ह उचितुचि अनुवाद सिध्द ॥१३॥
या कारणें मियां । गौप्य दाविलें बोलुनियां ।
ऐसें नाहीं, आपसया । प्रकाशुचि ॥१४॥
आणि पूर्ण अहंता वेठलों । सैंघ आम्हीच दाटलों ।
मा लोपलों ना प्रगटलों । कोणा होऊनी ॥१५॥
आपणया आपणपें । निरूपण काय ओपे ? ।
मा उगेपणे हरपे । ऐसे आहे ? ॥१६॥
म्हणोनि माझी वैखरी । मौनाचेंहि मौन करी ।
हे पाणियावरी मकरी । रेखिली पां ॥१७॥
एवं दशोपनिषदें । पुढारी न ढळती पदें ।
देखोनि बुडी बोधें । येथेंचि दिधली ॥१८॥
ज्नानदेवो म्हणे श्रीमंत । हें अनुभवामृत ।
सेंवोनि जीवन्मुक्त । हेंचि होतु ॥१९॥
मुक्ति कीर वेल्हाळ । अनुभवामृत निखळ ।
परी अमृताही उठी लाळ । अमृतें येणे ॥२०॥
नित्य चांदु होये । परी पुनवे आनु आहे ।
हें कां मी म्हणों लाहें । सूर्यदृष्टी ? ॥२१॥
प्रिया सावायिली होये । तै अंगीचे अंगीं न समाये ।
येर्हवीं तेथेंचि आहे । तारुण्य कीं ॥२२॥
वसंताचा आला । फळीं फुलीं आपला ।
गगनाचिया डाळा । पेलती झाडें ॥२३॥
ययालागीं हें बोलणें । अनुभामृतपणें ।
स्वानुभूति परगुणें । वोगरिलें ॥२४॥
आणि मुक्त मुमुक्षु बद्ध । हें तंववरी योग्यता भेद ।
अनुभामृतस्वाद । विरुद्ध जंव ॥२५॥
गंगावगाहना आली । पाणीयें गंगा झालीं ।
कां तिमिरें भेटलीं । सूर्या जैशीं ॥२६॥
नाहीं परिसाची कसवटी । तंववरीच वानियाच्या गोठी ।
मग पंधरावयाच्या पटीं । बैसावें कीं ॥२७॥
तैसें जे या अखरा । भेटती गाभारां ।
ते वोघ जैसे सागरा । आंतु आले ॥२८॥
जैशा आकारादि अक्षरा । भेटती पन्नासही मात्रा ।
तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥२९॥
तैसी तये ईश्वरीं । अंगुळी नव्हेचि दुसरी ।
किंबहुना सरोभरीं शिवेसीचि ॥३०॥
म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें ।
सणु भोगिजे सणें विश्वाचेनि ॥३१॥
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे ग्रंथपरिहारकथनं नाम दशमं प्रकरणं संपूर्णम् ॥
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना