संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव.- विंदा करंदीकर
ज्ञानदेवविरचित अनुभवामृताचे विंदाकृत अर्वाचिनीकरण.
विंदा करंदीकरांनी ज्ञानदेवांच्या अनुभवामृताचे अर्वाचिनीकरण करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यानी अमृतानुभव या मूळ ओवीबध्द ग्रंथाचे अर्वाचीन मराठी भाषेत रुपांतर करताना ओवीछंदाचाच उपयोग केला आहे. या अर्वाचिनीकरणाच्या निमित्ताने अभ्यासपूर्ण प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. परंतू हे लिखाण प्रस्तावना समजून वाचण्याऐवजी एक वैयक्तिक प्रतिक्रिया समजून वाचायचे आहे असे नमूद केले आहे. ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाचा
आणि अमृतानुभवाचा अभ्यास करणारांसाठी हा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे.
प्रकाशक : मौज प्रकाशन.
पहिली आवृत्ती : जुलै १९८१
पृष्ठसंख्या : २०८
अभंग अमृतानुभव - स्वामी स्वरूपानंद (पावस)
श्री ज्ञानदेवांच्या 'अनुभवामृता' चा अभंगात्मक अनुवाद.
रत्नागिरिजवळील पावस येथे समाधी घेतलेले स्वामी स्वरूपानंद यांनी अमृतानुभवाचा अभंगात्मक अनुवाद केला आहे.
प्रकाशक : कार्यवाह, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस, रत्नागिरी.
७ वी आवृत्ती : शके १९२३
पृष्ठसंख्या : २०२
अमृताचा अनुभव - हेमंत राजाराम.
ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा छंदानुवाद
कवी श्री हेमंत राजाराम यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन ज्ञानेश्वर जयंती, २३ ऑगस्ट २००८ रोजी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे हस्ते झाले. अत्यंत साध्या परंतू प्रासादिक भाषेतील या ग्रंथामुळे सर्वसामान्य मराठी वाचकाला अमृतानुभवाचा आस्वाद घेता येईल. त्यासाठी मराठीचा विद्वान असण्याची गरज नाही. अष्टाक्षरी छंदात रचलेल्या या ग्रंथात भाषेचे अनेक वेगवेगळे प्रयोग हेमंत राजाराम यांनी केलेले आहेत हे उदाहरणासह डॉ. सदानंद मोरे यानी दाखवून दिले. प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांनी अत्यंत वेगळ्या परंतू समर्पक मुखपृष्ठ, मांडणी व सजावट करून हा ग्रंथ अतिशय देखणा केला आहे.
ग्रंथाबद्दल बोलताना प्रसिध्द कवी अशोक बागवे यांनी आजच्या काळात हा ग्रंथ हेमंत राजाराम यांनी लिहिला आणि तोही अष्टाक्षरी छंदात लिहिला हे अतिशय महत्त्वाचे काम कवीने केले आहे. बहिणाबाईंनी आपले काव्य जसे अष्टाक्षरी छंदात केले त्यामुळे ते कुणालाही कळते, त्याचप्रमाणे हेमंत राजाराम यांचा ग्रंथ सर्वसामान्य मराठी वाचकाला कळेल आकळेल असा झाला आहे, असे बागवे यांनी नमूद केले.
प्रकाशक / वितरक : प्रसाद कुलकर्णी, संस्कार प्रकाशन, मुंबई.
पहिली आवृत्ती : २००८
पृष्ठे : १५६
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना