श्री हेमंत राजाराम यांनी नव्या छंदात उस्फूर्तपणे रचलेला `अमृताचा अनुभव' हा ग्रंथ माझ्या वाचनात आला, आणि वाटले भवभूती म्हणाला ते खरेच. भवभूती काय म्हणाला होता? "ह्या पृथ्वीवर माझ्यासमान ज्ञान, विद्या इत्यादि असणारा गुणवंत नक्की पुढे केव्हातरी उदयास येईल. कारण ही पृथ्वी दिव्य आहे, अनंत आहे." मला असे का वाटले? ज्ञानदेवांनी लिहिलेल्या 'जगातील अद्वितीय' अशा अत्यंत श्रेष्ठ तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाचा नव्या स्वरूपात तितक्याच रसाळपणे आविष्कार करणारे कवी हेमंत ह्यांची ही रचना वाचली आणि सुखावलो, चकित झालो, आनंदाने माझे मन भरून आले. आणि वाटले - त्यांचा हा ग्रंथ प्रसिध्द होईल तेव्हा रसग्रहणात्मक प्रस्तावना आपण लिहावी.
माझ्या मते हळुवार शब्दांच्या पानाफुलातून तत्वज्ञानाचे चांदणे झिरपावे अशा ज्ञानदेवांच्या ओव्यातील 'रहस्य' कवी हेमंतांनी
चांदण्यांचे पुष्पगुच्छ वाटतील अशी अष्टाक्षरी छंदोरचना करून सादर केले आहे. कवी काव्यरचना करताना ज्या एका उन्मनी अवस्थेत जातो, त्याच अवस्थेत जेव्हा ती रचना वाचणाराही जातो, तेव्हा वेदांताची परिभाषासुध्दा अमृतमयी होते. ज्याला ध्यानाचे मानसशास्त्र आणि मनाची ध्यानावस्था यांचा परिचय आहे, त्यांना कवी हेमंतांच्या या रचनेतून आत्मानंद नक्की मिळेल.मोक्षाच्या मार्गावरील पाथेयात `खाऊ' म्हणून डाळिंबाचे दाणेच घ्यावेत, आणि आधीच तृप्त असलेले मन नुसतेच `अहाहा' म्हणत एका मुक्कामावरून दुसर्या मुक्कामावर जावे असे अनुभवही प्रत्येक प्रकरणात येतील. सहजसुलभ अशी शब्दांची व विचारांची मांडणी या ग्रंथात, प्रमेयाची समजूत पाडून घेण्यास आपल्याला साहाय्य करते. आपल्या प्रतिभेची, कल्पनाशक्तीची आणि आत्मरतीची उच्च शिखरे जी ज्ञानदेवांनी `अमृतानुभव' या सुमारे ९०० ओव्यांच्या ग्रंथात गाठली आहेत, तीच शिखरे 'हेमंत राजाराम' नावाच्या नवीन 'गिर्यारोहक' कवीने गाठली आहेत. ज्ञानदेवांनी चोखाळलेली वाट नागमोडी आहे, तरी पदोपदी प्रमेयाच्या जवळ नेणारीच आहे, तशीच कवी हेमंतांची शब्दरचना प्रमेयसापेक्ष वाटचाल करणारी आहे. त्यात कुठेही मार्ग सोडून पाऊल तिरके पडत नाही. फरक एवढाच ही, एक नवी लय या रचनेत आढळते. आणि संतांनी जशी वैकुंठाची वाट सोपी केली, तशी हेमंतांनी अमृताची वाटही सोपी केली आहे.
गद्यप्राय शब्दांचा उपयोग करून. ओवीरूप रचनेचे पथ्य सांभाळून केलेले, अमृतानुभवाचे आधुनिकीकरण रसभंग करणारे ठरते आणि राजेशाही थाटात वावरणार्या माणसाला गोणपाटावर बसायला सांगावे असे अनौचित्य प्रत्ययास येते, अशी काही उदाहरणे ह्या ग्रंथाच्या बाबतीत मराठी वाङमयात आहेत पण हेमंतांच्या रचनेत वसंतऋतूतील मोकळी हवा आणि गंधफुलांचा बहर अनुभवास येतो. रसहानी मुळीच होत नाही. एका विधानच्या पुष्टीसाठी अनेक दृष्टांतांची आणि प्रतिमांची 'बरसात' ज्ञानेश्वर करतात; त्याच प्रतिमांचे स्वरूप फुलांच्या माळेप्रमाणे ह्र्द्य वाटावे अशी मननीय रमणीयता ह्या अमृताच्या अनुभवात साधली आहे.
कवी हेमंत यांच्यावर ज्ञानदेवांनी कृपा केली म्हणूनच त्यांच्या हातून ही सहजसुंदर रचना झाली अशी भावना त्यांच्या ह्रदयात आहे. त्यामुळे अहंकाराला नकार दिला गेला व ध्याता ध्येय ध्यानादि त्रिपुटीच्या पलीकडे जाऊन शब्दांनी निराकाराची तत्त्वमंदीरे सजवली. मी कवी हेमंतांना सुयश चिंतितो.
दिवाकर अनंत घैसास.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना