अमॄताचा अनुभव

अमॄताचा अनुभव |
सांगतसे ज्ञानदेव |
माझा चाकाटला जीव | त्याचे कौतुक सांगतो ||१||

सद्‍गुरुंनी सांगितले |
अनुभवाला जे आले |
सांग तुझ्या मनातले | ज्ञानदेवा इतरांना ||२||

गुरुदेवांचे ऐकले |
ज्ञानदेवांनी लिहिले |
अनुभवालाच आले | अमॄताचे अनुभव ||३||

ज्ञानियाचा अनुभव |
त्यात कशाची उणीव |
आले अमॄताचे गाव | माझ्या मनी वसतीला ||४||

अमॄताचे गाव असे |
रेडा वेद बोलतसे |
तेथे भिंत चालतसे | तसे माझे हे लिहिणे ||५||

होता काळोख दाटला |
अज्ञानाचा तो आटला |
नवा प्रकाश फाकला | जाणिवेच्या क्षितिजाशी ||६||

ज्ञानियाची शब्दकळा |
शुभ्र चांदण्याचा मळा |
माझ्या मनाचा सगळा | आसमंत बहरला ||७||

बहरल्या मनातला |
गंध प्राणात पोचला |
एक आनंद नाचला | माझ्या गात्रा-गात्रातून ||८ ||

त्याच आनंदाचे पोटी |
काव्य आले माझ्या ओठी |
खुला तुमच्याहीसाठी | त्याचा आनंद सोहळा ||९||

माझे काहीच हे नाही |
मूळ ग्रंथ अर्थवाही |
गूढ उकलत जाई | आपोआप चैतन्याचे ||१०||

आता बोलत मी नाही |
माझ्या मनीचे; ही ग्वाही |
ज्ञानियाची किमया ही | नव्या छंदात मांडतो ||११||

शब्द विरूनिया जावा |
अर्थ मनी रेंगाळावा |
माझा विसर पडावा | ज्ञानदेव आठवावा ||१२||

--हेमंत राजाराम.

अमृतानुभवाचा छंदानुवाद

लेखन लिपी

देवनागरी / मराठी
Roman / English

F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

येण्याची नोंद